Brisbane International Tennis : बारा महिन्यांनंतर कोर्टवर परतणाऱ्या राफेल नदालचा ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये शानदार प्रवास सुरूच आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुबलरचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश धडक मारली आहे. जिथे त्याचा सामना आणखी एक स्थानिक खेळाडू जॉर्डन थॉम्पसन याच्याशी होईल.
दरम्यान, गेल्या वर्षी हिपच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला स्पेनचा नदाल यानं स्पर्धेतील दुहेरीच्या सामन्याव्दारे तब्बल 12 महिन्यांनंतर कोर्टवर परतला. दुहेरीत तो पराभूत झाला असला तरी एकेरीत त्याने पहिल्या फेरीत माजी यूएस ओपन विजेत्या डॉमिनिक थिएमचा पराभव केला. नदाल याला गुरुवारी कुबलरचा पराभव करताना कोणतीही अडचण आली नाही. तर दुसरीकडे 2017 च्या विजेत्या ग्रिगोर दिमित्रोव्हने डॅनियल ऑल्टमायरचा 6-1, 6-2 ने पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सबालेंका, रिबाकीना यांची आगेकूच…
अव्वल मानांकित बेलारूसची आर्यन सबालेंका आणि द्वितीय मानांकित कझाकिस्तानची एलेना रिबाकीना यांनीसुध्दा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सबालेंकाने चीनच्या झू लिनचा 6-1, 6-0 असा पराभव केला तर रिबाकीना हिनं लिस मर्टेन्सचा त्याच फरकाने पराभव केला.
तर दुसरीकडे याच स्पर्धेत 2009 मधील या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीची विजेती बेलारूसची 34 वर्षीय व्हिक्टोरिया अजारेंकाने फ्रान्सच्या क्लारा बुरेलचा 7-5, 6-2 असा पराभव करून अंतिम-8 मध्ये प्रवेश केला.