माद्रिद :– स्पॅनिश स्टार राफेल नदाल (Rafael Nadal) जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने स्वतः याबाबदची माहिती दिली आहे. २२ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदाल जानेवारीपासून दुखापतीमुळे टेनिस कोर्टपासून दूर होता.
“एक वर्ष स्पर्धांमध्ये भाग न घेतल्यानंतर आता पुनरागमन करण्याची वेळ आली आहे,”असे त्याने समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतील पराभवा दरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे, मे महिन्यात तब्बल १४ वेळा फ्रेंच ओपन ही स्पर्धा जिंकणाऱ्या नदालने, तो यंदा स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. ‘माझ्यापुढे पुढील वर्षी काय मांडून ठेवलंय माहीत नाही. पण पुढचे वर्ष माझ्या करिअरचे शेवटचे वर्ष असेल अशी माझी इच्छा आहे,’ असे एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता. जूनमध्ये बार्सिलोनामध्ये त्याच्यावर ‘आर्थ्रोस्कोपिक’ शस्त्रक्रिया झाली होती.