अतिक्रमणांमुळे गुदमरतोय वाई शहराचा श्‍वास

वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर
अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्याची गरज
वाई पोलीस अन्‌ पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत 

वाई – मुळातच वाई शहरातील रस्ते अरुंद आहेत आणि आता या रस्त्यांवरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आल्याने पुन्हा एकदा वाई शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे वाई शहराचा श्‍वास गुदमरू लागला आहे. वाई शहरातील वाहतुकीच्या संदर्भात अनेक वेळा वाहतूक आराखड्याला मंजुरीचे कारण पुढे करत पोलीस व पालिका प्रशासन ढम्म झाल्याने वाईकर नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा वाई शहरातील रस्त्यावर झालेल्या बेसुमार अतिक्रमणाचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार-चाकी, दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना साधे चालतासुध्दा येत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे. अतिक्रमणासह सध्या वाई शहरात पार्किंगचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होवूनसुध्दा पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने वाईकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वाई शहरातील मुख्य रस्त्यांवर व शहराच्या मुख्य चौकात या बाबी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. किसनवीर चौका-ते-चित्रा टॉकिज मुख्य रस्ता, महागणपती मंदिरासमोरील चौकात, किसनवीर चौक ते जैन मंदिर, किसनवीर चौक ते सरकारी दवाखाना या मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुचाकी उभ्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यातच या परिसर शहरातील मुख्य बाजार पेठ असल्याने दुकानदारांच्या नावाचे बोर्ड व जाहिरात फलक हे रस्त्यावर ठेवल्याने नागरिकांना चालताना जीव मुठीत घेवून चालावे लागते.

समविषम तारखांचे बोर्ड नावालाच उभे आहेत. अवजड वाहने कधीही कोठेही माल उतरविण्यासाठी उभी असतात, त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. याचा नाहक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी पार्किंग न सोडताच बांधकाम चालू आहेत. अनेक वेळा वाईकरांशी सल्लामसलत करण्यासाठी दोन्ही प्रशासनाने आढावा बैठकीचे आयोजन केले होते. तरीही त्यावर कोणत्याही ठोस उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. नियोजन बैठका हा निव्वळ फार्स ठरला आहे. जिल्हा अधीक्षकांनी वाई शहरातील वाहतुकीविषयी आश्‍वासन देवूनही वाहतुकीविषयी कसलीही अंमलबजावणी करण्यात येत नसेल तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)