ओटीटी प्लॅटफॉर्म “झी-5′ पुरस्कार विजेता चित्रपट निर्मात्यांची जोडी अश्विनी अय्यर तिवारी आणि नीतेश तिवारी पुन्हा एकदा “ब्रेक पॉइंट’मध्ये एकत्रित काम करत आहेत. ही वेब सीरिज भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांच्यावर आधारित आहे. या सीरिजचे एकूण सात भाग असणार आहेत.
निर्मात्यांनी या वेब सीरिजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज केले आहे. या पोस्टरला सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पोस्टरवरून या दोन्ही खेळाडूंमधील संबंध आणि ब्रेकअपबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
“ब्रेक पॉइंट’च्या दिग्दर्शनाबाबत अश्विनी अय्यर तिवारी आणि नीतेश तिवारी यांनी एक संयुक्त वक्तव्य करत सांगितले की, “झी-5’सारख्या घराघरात पोहोचलेल्या प्लॅटफॉर्मवर यासारखी एक शृंखला स्क्रीनवर दाखविने आमच्यासाठी एक खास बाब आहे.
महेश भूपती आणि लिएंडर पेस यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत काम करणे एक अद्भुत अनुभव आहे. तसेच त्यांच्या जगाला माहीत नसलेल्या गोष्टी चाहत्यांसमोर मांडणे खूपच कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.