काबुल: तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच तेथील सर्वसामान्यांचे जीवन एका क्षणात पूर्णपणे बदलून गेले आहे. एका रात्रीतून देश गुलामगिरीच्या जोखडात पुन्हा एकदा अडकला. तालिबान्यांचा फटका हा केवळ सर्वसामान्य जनतेलाच बसला असे नाही तर सेलिब्रेटी आणि मंत्र्यांनाही याचा फटका बसला आहे. याच मंत्र्यांच्या यादीत अफगाणिस्तानचे माजी आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत यांचा समावेश आहे. सादत यांच्यावर आपला देश सोडून जर्मनीमध्ये चक्क पिझ्झा विकण्याची वेळ आली आहे .
अफगाणिस्तानमध्ये सय्यद अहमद शाह सादत हे आयटी मंत्री होते आणि या पदावर असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. नंतर ते अफगाणिस्तान सोडून जर्मनीला गेले होते. सध्या ते पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून, जर्मनीच्या रस्त्यांवर सायकलवरून पिझ्झा डिलिव्हरीचे काम करताना पाहायला मिळत आहे.
एका अहवालानुसार सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या आणि राष्ट्रपती घनी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. राजीनामा दिल्यानंतर ते काही काळ देशात राहिले, परंतु नंतर ते जर्मनीला गेले. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चालले, परंतु नंतर त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि पैशांच्या अभावी त्यांनी अखेर पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनण्याचा निर्णय घेतला. तसेच डिलिव्हरीचे काम करण्यात कोणतीही लाज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेताच त्यांची सत्ता देशात प्रस्थापित केली. तालिबानने मंगळवारी आपल्या अंतरिम सरकारच्या अनेक मंत्र्यांची घोषणा केली. तालिबानने मुल्ला सखाउल्लाहला काळजीवाहू शिक्षण मंत्री आणि अब्दुल बारी यांची उच्च शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर सदर इब्राहिम यांना अंतरिम गृहमंत्री बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुल्ला शिरीन यांना काबूलचे राज्यपाल आणि हमदुल्ला नोमानी यांना काबूलचे महापौर बनवण्यात आले आहे.