नवी दिल्ली – राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशनामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली असताना दिल्लीमधून लोकसभा अधिवेशनाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. आज अचानक लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यामुळे दिल्ली दरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी खासदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चीनमध्ये कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. अशात पंतप्रधानांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकसभा अधिवेशन हे २९ डिसेंबर पर्यंत चालणार होते. म्हणजेच आजचा दिवस पकडून आणखी ५ दिवस कामकाज चालणार होते. परंतु अचानक आज कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबर रोजी सुरुवात झाली होती. आणखी पाच दिवस हे कामकाज चालणार असल्याने अद्याप बऱ्याच मागण्यांची पूर्तता होणे बाकी होते. आजच्या दिवशी ३४ गैर सरकारी विधेयकांबाबत विचार केला जाणार आहे त्यासह लोकसभेच्या काही विधेयकांवर चहरचा देखील आज होणार होती.
पंतप्राधानानी घेतली कोरोना पार्श्वभूमीवर बैठक
पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील करोनाची सद्य:स्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची सज्जता, लसीकरण मोहिमेची परिस्थिती, करोनाचे उत्परिवर्तित विषाणू आणि त्याच्या परिणामांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी करून करोनाबाबत उपाययोजनेमध्ये आत्मसंतुष्ट राहू नका आणि सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांमध्ये सुधारणा करा, अशी सूचना राज्यांना केली. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २४ तारखेपासून परदेशातून आलेल्या २ टक्के प्रवाशांची क्रमविरहित करोना चाचणी केली जाणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशात करोनाबाबत खबरदारीचे उपाय राबवण्यात येणार आहेत.