टाकळी हाजी : ‘आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो…त्यांना कुठे शोधू?…’ म्हणत एका वृद्ध दाम्पत्याने हंबरडा फोडला आहे. आयुष्याच्या शेवटी ज्यांच्यासोबत निवांत वेळ घालवायचा त्याच दोन तरुण मुलांना कोरोनाने हिरावून नेले आहे. वृद्धापकळात डोळ्यांदेखत कोरोनामुळे उद्धवस्त झालेला संसार या वृद्ध दांपत्याच्या जिव्हारी लागला आहे.
दहा दिवसांत दोन मुलांचा मृत्यू या घटनेमुळे मलठण (ता.शिरूर) येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूर्या सांगवी (ता. पारनेर) जिल्हा नगर येथील कृष्णकांत व मंगल ह्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मलठण (ता. शिरूर) येथे आले होते. कोरोनामुळे विशाल कृष्णकांत गायकवाड 22 एप्रिल आणि तुषार कृष्णकांत गायकवाड 3 मे ला कोरोनामुळे मृत्यू झाला. सख्खे भाऊ असून, दहा दिवसांत दोन कर्त्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कृष्णकांत गायकवाड व पत्नी मंगल यांनी टाहो फोडला.
मोलमजुरी करीत प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढणाऱ्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका ह्या कुटुंबाला बसला. विशालला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आजार अंगावर काढला, त्यामुळे (ता. २२) एप्रिलला विशालचा मृत्यू झाला. त्याचे सर्व अंत्यसंस्कार तुषारने केले आणि दोन दिवसांत तो ही पॉझिटिव्ह आला. त्रास होऊ लागल्याने तुषारला हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र ऑक्सिजन कमी आल्याने १० दिवस त्यानेही मृत्यूशी झुंज दिली.
ह्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक मित्रमंडळींनी निधी जमविला. त्याला मानसिक, आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. तुषारचा देखील (ता. ३) मे ला मृत्यू झाला. ‘आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो….त्यांना कुठे शोधू?…’हा वृद्ध मातापित्यांचा टाहो आसमंतात विरून गेला….! ही घटना अगदी काळजाचा ठोका चुकविणारी ठरली.