लखनौ :- भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने जागतिक गट क्रमांक दोनमधील डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत युकी भांबरीसह खेळताना मोरोक्को संघाचा पराभव केला. या विजयासह बोपण्णाने आपल्या कारकिर्दीची यशस्वी सांगता केली.
बोपण्णा व भांबरी या जोडीने मोरोक्कोच्या इलियट बेंचेट्रीट व युनिस लारोयुस्सी या जोडीवर 6-2, 6-1 असा विजय मिळवला. हा सामना एक तास 11 मिनिटे चालला. या विजयासह भारताने या गटात 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
बोपण्णाने त्याच्या कारकिर्दीत 33 डेव्हिस करंडक सामन्यात भाग घेतला व त्यात 23 विजय नोंदवले आहेत. त्यात 13 दुहेरीतील विजयांचा समावेश आहे. या सामन्यानंतर बोपण्णाच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीची यशस्वी सांगता झाली. हा सामना पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय तसेच मित्र परिवार उपस्थित होता.
गेल्या आठवड्यात अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत बोपण्णा पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.