नवी दिल्ली – निवडणूक रोख्यांचा (election bonds) जो डेटा उपलब्ध झाला आहे त्यातून भाजपचा भ्रष्टाचारच उघड झाला आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कंपनीच्या संरक्षणासाठी देणग्या मागणे, छाप्यांची धमकी देऊन लाच स्वीकारणे आणि शेल कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंग करण्याचा प्रकार यातून घडल्याचे दिसून येत असे त्यांनी म्हटले आहे. या संबंधातील काही प्रकरणे कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी लोकांपुढे आणली आहेत. (BJP’s corruption exposed through election bonds – Congress claims)
या संबंधात कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, सन २०१९ पासून १३०० हून अधिक कंपन्या आणि व्यक्तींनी निवडणूक रोख्यांद्वारे राजकीयपक्षांना देणग्या दिल्या आहेत त्यातील तब्बल सहा हजार कोटी रूपयांहून अधिकची रक्कम भाजपला मिळाली आहे. आतापर्यंत, निवडणूक रोख्यांची आकडेवारी भाजपच्या किमान चार भ्रष्ट डावपेचांचा पर्दाफाश करते, असा दावा रमेश यांनी केला.
यातला पहिला प्रकार क्विड प्रो क्वो: स्वरूपाचा आहे. यात ज्या कंपन्यांनी भाजपला या रोख्याद्वारे पैसा दिला अशा कंपन्यांना सरकारकडून मोठा फायदा करून देण्यात आला आहे. मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्राने निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला ८०० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे, त्यांना अवघ्या एका महिन्यानंतर, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे १४ हजार ४०० कोटी रूपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले.
जिंदाल स्टील अँड पॉवरने रु. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी निवडणूक रोख्यांद्वारे २५ कोटी रूपये दिले आणि त्यांना तीन दिवसांनंतर लगेच एक कोळसा खाण मिळाली. भाजपने यात हप्तावसुलीही केल्याचे दिसून येत आहे असे जयराम रमेश यांनी म्हटले असून भाजपची हफ्ता वसूली रणनीती म्हणजे ईडी/सीबीआय/आयटीद्वारे लक्ष्यावर छापे टाकणे आणि नंतर कंपनीच्या संरक्षणासाठीत्यांच्याकडून रोख्यांद्वारे देणग्या मिळवणे.
भाजपला ज्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांतून देणगी दिली आहे त्यातील किमान १४ कंपन्यांवर छापे टाकून नंतर त्यांच्याकडून हप्ता वसुली करण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तपासात असे आढळून आले की ईडी/सीबीआय/आयटीच्या छाप्यांनंतर सरकारने या कंपन्यांना निवडणूक रोख्यांद्वारे भाजपाला देणगी देण्यास भाग पाडले गेले, असे रमेश म्हणाले. हेटेरो फार्मा आणि यशोदा हॉस्पिटल सारख्या अनेक कंपन्यांनी भाजपला ज्या देणग्या दिल्या हा त्यातलाच प्रकार होता. आयटी विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये शिर्डी साई इलेक्ट्रिकल्सवर छापा टाकला आणि जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी इलेक्टोरल बाँड्सद्वारे भाजपला ४० कोटी रुपयांची देणगी दिली,” असा दावा काँग्रेस नेत्याने केला.
फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल्सने १२०० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे, त्यांच्यावरही असेच ईडीद्वारे छापे टाकले गेेले आणि त्यांच्याकडून नंतर देणग्या वसुल केल्या गेल्या. आयटी विभागानेही ऑक्टोबर 2023 मध्ये फ्यूचर कंपनीवर छापे टाकले आणि त्याच महिन्यात त्यांनी रोख्यांद्वारे ६५ कोटी रूपये दिले.
केंद्र सरकारकडून काही हँडआउट्स मिळाल्यानंतर लगेचच, या कंपन्यांनी इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून उपकाराची परतफेड केली आहे, असा एक नमुना समोर आल्याने डेटा किकबॅककडेही निर्देश करतो असा आरोप रमेश यांनी केला.वेदांतला ३ मार्च २०२१ रोजी यांना राधिकापूर खाजगी कोळसा खाण मिळाली आणि त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी निवडणूक रोख्यांमध्ये भाजपला २५ कोटी रुपयांची देणगी दिली,” असा आरोप त्यांनी केला.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्राला ऑगस्ट २०२० मध्ये ४५०० कोटी रुपयांचा झोजिला बोगदा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले, त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे २० कोटी रुपयांची देणगी भाजपला दिली. मेघाला डिसेंबर 2022 मध्ये बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि त्याच महिन्यात त्यांनी ५६ कोटी रूपयांची देणगी दिली. रमेश यांनी आरोप केला की शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याचेही या डेटातून उघड झाले आहे.