नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यापूर्वी अनेकदा इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रांविरोधातील ( EVM) विविध याचिकांवर सुनावणी केली आहे. एकाही याचिकाकर्त्याला या यंत्रांमध्ये दोष असल्याचे सिद्ध करता आलेले नाही. असे असताना सर्वोच्च न्यायालय आणखी किती वेळा या एकाच विषयावर सुनावणी घेणार आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. (The Supreme Court dismissed the petition against EVM)
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजीव खन्ना, न्या. दीपंकर दत्ता आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सांगितले की, न्यायालयाने ईव्हीएमच्या कामाशी संबंधित याचिकांवर आधीच सुनावणी केली आहे. अलीकडेच आम्ही व्हीव्हीपॅटशी संबंधित याचिकेवरही सुनावणी केली. आम्ही केवळ अंदाजावर काम करू शकत नाही. आम्ही घटनेच्या कलम ३२ नुसार याचिका ऐकू शकत नाही अथवा ती फेटाळू शकत नाही.
ईव्हीएममध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रत्येक प्रक्रियेचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ही याचिका फेटाळून लावली.
भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करुन दाखवण्याचे खुले आव्हान अनेक वर्षांपूर्वी दिले आहे. मात्र आजवर एकानेही हे आव्हान स्वीकारलेले नाही. एव्हीएम हॅक करुन दाखवणारास रोख रकमेचे इनामही आहे. मात्र, अनेकदा उमेदवार पराभूत झाल्यानंतर ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करतो; एकाही विजयी उमेदवाराने आजवर ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केलेला नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेले आहे.