Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष झटत असताना निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका भविष्यवाणीमुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटात उत्साह संचारला आहे. अर्थात आपण जे सांगतो आहोत ती भविष्यवाणी नसून आपल्या अनुभवावरून केलेला अंदाज असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी अलिकडेच विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ही भविष्यवाणी केली आहे. त्यात ते असे म्हणाले आहेत की २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची कामगिरी चांगली राहणार आहे.
त्याहीपुढे जात ते असे म्हणाले की यंदा भाजपची कामगिरी ही तृणमूल कॉंग्रेसपेक्षा चांगली होणार आहे. बंगालमध्ये जो निकाल लागणार आहे ते चकित करणारा असेल आणि ही निवडणूक तृणमुल कॉंग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे.
प्रशांत किशोर म्हणतात की २०२१ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत आपली गती राखण्यासाठी भारतीय जनता पार्टीला खूप संघर्ष करावा लागला होता. त्या तुलनेत आज हा पक्ष बंगालमध्ये एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयाला आला आहे. आता असे स्पष्ट दिसते आहे की मागील निवडणुकीपेक्षा त्यांची स्थिती आता भक्कम आहे.
२०१९ च्या निवडणुकीत बंगालच्या ४२ जागांपैकी तृणमुल कॉंग्रेसला २२, भाजपला १८ तर कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. आता तृणूमलपेक्षाही जास्त जागांवर भाजपचा विजय होणार असा दावा जर प्रशांत किशोर करत असतील तर निश्चितच भाजपच्या गोटात उत्साह निर्माण करणारी व ममता बॅनर्जी यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे.