मुंबई – कर्नाटक राज्यातील बेंगळुरू याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तसेच आता कर्नाटक येथील मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला. “शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ”, हे बेगडी धंदे भाजपने आता बंद करावेत, असा थेट इशारा त्यांनी भाजपला केला आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी वाराणसी येथील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्रात येऊन महाराजांचे कौतुक केले. असे असताना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला निषेध प्रस्तावाला विरोधी पक्षाने अनुमोदन दिलं खरं, मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध एकाही भाजप नेत्याने केलेला नाही. मिटकरी यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. प्रवीण दरेकर यांनी याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला इतका कळवळा असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. याबद्दल राज्यातील सर्व भाजप नेत्यांनी तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
पंतप्रधान मोदींबद्दल कोणी काही बोलले तर भाजपचे लोक सभागृहात गदारोळ करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणी बोलले तर यांना काही घेणंदेणं नसेल तर हे महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका मिटकरी यांनी केली. तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी कर्नाटक घटनेचा निषेधाचा ठराव मांडवा तरच शिवाजी महाराजांचे नाव घ्यावे अन्यथा “शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ”, हे बेगडी धंदे त्यांनी बंद करावेत, असा घणाघात मिटकरी यांनी केला.