नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी भारतीय भांडवल बाजारातून गुंतवणूक काढून घेणे चालूच ठेवले आहे. डिसेंबरमध्ये आतापर्यंत या गुंतवणूकदारानी तब्बल 17,696 कोटी रुपये काढून घेतल्याची माहिती शेअर बाजारांकडून देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 13,470 कोटी रुपये तर कर्ज रोखे बाजारातून 4,066 कोटी रुपये काढून घेतले आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये या गुंतवणूकदारांनी 2,521 कोटी रुपये काढून घेतले होते.
मॉर्निंग स्टार इंडिया या संस्थेचे संशोधक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, एकतर अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ होणार आहे. त्याचबरोबर करोनाचे नवे रुग्ण विकसित देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या दोन कारणांमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत.
फक्त भारतातूनच गुंतवणूक काढून घेतली जात नाही तर इतर वेगाने विकासित होणाऱ्या देशातूनही गुंतवणूक काडून घेतली जात आहे. एकीकडे अमेरिकेतील व्याजदर वाढणार असतानाच भारतातील रुपयाचे अवमूल्यन वेगाने होत आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतातील गुंतवणुकीवरील परतावा कमी होत आहे.
हीच बाब इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशाच्या संदर्भातही लागू पडते. भारताच्या विकासदराबाबत शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर भारतात महागाई वाढणार असल्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम विकासदरावर होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटते.