नगर – राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या नगर महापालिकेच्या राजकारणाने आज आणखी एक नवा पायंडा पाडला. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी निश्चित असलेले उमेदवार थेट विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तंबूत अचानक दाखल झाले. त्यामुळे सभापतिपदासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत सरळ लढत होईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी पाच, भाजपचे चार, तसेच कॉंग्रेस व बसपचा प्रत्येकी एक सदस्य, असे संख्याबळ आहे. भाजपतर्फे मनोज कोतकर सभापतिपदासाठी इच्छुक होते. त्यांना भाजपची उमेदवारी देखील निश्चित असल्याचे श्रेष्ठींनीच अनेकदा सांगितले. मात्र, भविष्यातील राजकीय अडचणी लक्षात घेवून आज कोतकर यांनी भाजपला “जय श्रीराम’ करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे आदींनी त्यांचे स्वागत केले.
पक्षात प्रवेश करताच त्यांना स्थायी समिती सभापतिपदाची उमेदवारी देखील घोषित करुन लगेचच कोतकर यांचा उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेतर्फे योगिराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महापालिकेत आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी शिवसेना टक्कर घेईल, असेच चित्र निर्माण झाले आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारच पळून गेल्याने भाजप हतबल झाले आहे. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला नाही.
“झूम’वर शुक्रवारी ऑनलाइन सभा
<महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी झूम ऍपवर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाइन सभा होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी सभेचे पीठासीन अधिकारी असतील. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात रंगीत तालीमही घेण्यात आल्याची माहिती महापालिकचे प्रभारी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी दिली.
सत्तेची चावी कॉंग्रेस, बसपच्या हातात..!
<सभागृहातील संख्याबळानुसार सत्तेची चावी कॉंग्रेस व बसपच्या हातात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील सत्तेचा संदर्भ देत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्याही उमेदवाराला भाजप मतदान करेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे भाजपचे सदस्य एकतर गैरहजर राहतील किंवा मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत, असे मानले जाते. त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार कोतकर यांच्यासह राष्ट्रवादीकडे सहा सदस्य आहेत. शिवसेनेकडे पाच सदस्य आहेत. सर्व सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतल्यास सभापतिपदासाठी नऊ जणांचे मतदान लागेल. मात्र, भाजप तटस्थ राहिल्यास सात सदस्यांचेच बहुमत होईल. त्यामुळे सत्तेची चावी आता कॉंग्रेस व बसप सदस्यांच्या हातात गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.