शिक्षण विभागात ठेकेदारांची लुडबूड
स्थायी समिती सभेत सदस्यांचा गौप्यस्फोट
पिंपरी – शिक्षण विभागात ठेकेदारांची लुडबूड वाढली असून ठेकेदार फायली घरी घेऊन जातात. यावरून चाललेल्या चर्चेत स्थायी समिती सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे शिक्षण विभागाचा पदभार देण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. तर, शिक्षण विभागाच्या कारभारावरूनही ताशेरे ओढले.
विलास मडिगेरी स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका शाळांमधील पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके प्रश्नसंच खरेदी करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. प्रश्नसंच खरेदीसाठी 12 लाख 50 हजार रुपये खर्च अदा केले जाणार आहेत. या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना शिक्षण विभागाचा पदभार अजित पवारांना देण्यासाठी ठेकेदार पैशांच्या ऑफर देत असल्याचा गौप्यस्फोट सदस्यांनी केला.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या फायली ठेकेदार घरी घेऊन जातात. परंतु, आम्हाला महिना होऊनही माहिती दिली जात नसल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला. शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी माहिती देवू नये, असा कायदा विभागाचा अभिप्राय असल्याने माहिती न दिल्याचा खुलासा केला. अखेर अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी तातडीने माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या सगळ्यात कलाटे यांच्या आरोपांमुळे महापालिका प्रशासन मलईदार व महत्त्वाच्या विभागांसाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असल्याचे समोर आले आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ठेकेदार देखील हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येत आहे.