कोणतीही जीवतहानी झाली नसल्याची इराकची माहिती
वॉशिग्टन : इराण आणि अमेरिकेदरम्यान चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बगदादमधील ग्रीन झोनमध्ये पुन्हा एकदा रॉकेट हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराकी लष्करानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती इराकच्या लष्कराकडून देण्यात आली. अमेरिकेच्या दुतावासापासून 100 मीटर अंतरावर एक रॉकेट पडल्याचे समोर आले आहे.
Two rockets hit Iraqi capital’s Green Zone, reports AFP news agency, quoting security sources.
— ANI (@ANI) January 8, 2020
यापूर्वीही 5 जानेवारी रोजी बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराण समर्थक मिलिशियाने कत्युशा रॉकेटचा मारा केला होता. त्यावेळी काही रॉकेट अमेरिकन दुतावासाच्या आत पडले होते. हल्ल्यादरम्यान ग्रीन झोनमधील सायरन वाजत होते. एक रॉकेट अमेरिकन दुतावासापासून 100 मीटर अंतरावर पडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ग्रीन झोनच्या आत दोन कत्युशा रॉकेट डागण्यात आले. परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इराणने बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इरबिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकेचे 80 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला होता. कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचे इराणकडून सांगण्यात आले होते. या हल्ल्यानंतर अमेरिकेने आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता.