रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्‍तव्या विरोधात भीम आर्मी आक्रमक

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशोभनीय वक्‍तव्य करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. भीम आर्मीतर्फे जौनपुर जिल्ह्यात रामदेव बाबा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच बाबांच्या अटकेची मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

योगगुरू बाबा रामदेव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. त्याचा निषेध आता सर्व देशभरातून व्यक्‍त करण्यात येत आहे. जौनपुर जिल्ह्यातही असाच निषेध व्यक्‍त केला. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जेसीज चौकातून मिरवणूक काढून तहसील प्रांगण गाठले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अशोभनीय भाष्य करणाऱ्या बाबा रामदेव यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेशकुमार वर्मा यांना निवेदन देण्यात आले.

संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना बाबा रामदेव यांनी दहशतवादी विचारसरणी म्हणून संबोधित केले असे वक्‍त्यांनी सांगितले. ज्या वक्‍तव्याची माफीच दिली जाऊ शकत नाही अशा टीका सध्या करण्यात येत आहेत. तसेच या टीकेच्या माध्यमातून देशातील महापुरुषांचा अपमान करतात असेही आर्मीच्या प्रवक्‍त्यांनी म्हटले.

स्वत:च्या प्रसिद्धीसाठी बाबा रामदेव मुद्दाम असे भाष्य करतात, जे निंदनीय असल्याचेही आर्मीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बाबा रामदेव यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करताना त्यांनी जाहीरपणे देशातील जनतेची रामदेव बाबांनी दिलगिरी व्यक्त करण्याचीही मागणी केली आहे. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बाबा रामदेव यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला व उपजिल्हाधिकारी राजेशकुमार वर्मा यांना निवेदन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.