स्थायी समिती अध्यक्षांचे 15 दिवसांतच मत परिवर्तन : सल्लागार नेमण्याचा अखेर निर्णय
पुणे – यापुढे एकाही नियोजित प्रकल्पासाठी सल्लागार नेमणार नाही, असा निर्णय घेतलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचे 15 दिवसांतच मतपरिवर्तन झाले असून, “एचसीएमटीआर’चा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा विषय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
“एचसीएमटीआर’च्या मूळ आखणीत (अलाइनमेंट) 11 किमीचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचा पुन्हा नव्याने डीपीआर तयार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. डीपीआर तयार करून घेण्यासाठी पुन्हा स्वतंत्र सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव 15 दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रस्ताव पुढे ढकलताना महापालिकेच्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्याची पद्धतच रद्द करण्याची घोषणा अध्यक्ष कांबळे यांनी केली होती. मात्र, अवघ्या 15 दिवसांतच अचानक कांबळे यांचे मतपरिवर्तन झाले आहे.
महत्त्वाकांक्षी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाचा (एचसीएमटीआर) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यासाठी सल्लागारावर दोन कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या निविदा जादा दराने आल्याने त्या रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना पुन्हा प्रकल्पाच्या डीपीआर तयार करून घेण्याचा घाट घालण्यात
आला आहे.