खंडाळा स्टेशन-नागनाथ स्टेशनदरम्यान उपाय
पुणे – मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील बोरघाट परिसरात (मंकी हील) माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माकडांचा उपद्रवाचा फटका अनेकदा रेल्वेला बसतो. त्यामुळे या माकडांच्या उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने घाट या परिसरात “मंकी ट्रॅप’ बसवले आहेत.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाड्या बोरघाट परिसरातून जातात. याठिकाणचा परिसर डोंगराळ असल्याने येथे माकडांची संख्या मोठी आहे. ही माकडे रेल्वे लाइनवरील पोलवरून ओव्हरहेड वायरवर चढून वायरची ओढाताण करतात. यामुळे अनेकदा वायर तुटण्याच्या घटना घडतात. परिणामी, रेल्वेच्या संचलनात बिघाड होऊन रेल्वेगाड्या तासन्तास एका जागेवर थांबवण्याची वेळ येते. यावर रेल्वे प्रशासनाकडून उपाय शोधण्यात आला असून माकडांना वर चढण्यास प्रतिबंध घालण्यासाठी घाट परिसरात खंडाळा स्टेशन ते नागनाथ स्टेशन दरम्यान मंकी ट्रॅप बनवण्यात आले आहेत.
माकडांनी पोलवर चढू नये, यासाठी पोलच्या मध्यभागी “गॅल्वनाइज स्टील’चे आवरण लावले आहे. यामुळे माकडे पोलवर चढू शकत नाहीत. माकडांनी वर चढण्याचा प्रयत्न केल्यास ते घसरून खाली पडतात. यामुळे ओव्हरहेड वायरला अडथळा न येता संचलन सुरळीत सुरू राहील, असा विश्वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी व्यक्त केला.
रेल्वे मार्गावर कॅच स्लाइडिंगचे काम पूर्ण
मंकी हिल परिसरामध्ये सुरक्षेसाठी आवश्यक कॅच स्लाइडिंगचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यास, रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्यास किंवा गाडी रुळावरून घसरल्यास प्रवाशांना हानी पोहोचू नये, यासाठी कॅच स्लाइडिंगचा उपयोग होणार आहे. उताराच्या मार्गावर आणि घाट परिसरामध्ये सुरक्षिततेसाठी कॅच स्लाइडिंग तयार करण्यात येतात. रेल्वेच्या मुख्य मार्गावर कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कॅच स्लाअडिंगचा उपयोग होतो. गाडीमध्ये बिघाड झाल्यास गाडीचा वेग कमी करण्यासाठी गाडी कॅच स्लाईडिंगवर चढवण्यात येते. कॅच स्लाइडिंग साधारण 500 मीटरचे असते. यामुळे गाडीवर नियंत्रण आणणे सोपे जाते.