नगर -जांबूळ वन उपक्रमांतर्गत भापकर गुरूजींनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. रोपे लावण्याबरोबरच त्याचे संवर्धन देखील केले जात आहे. पर्यावरण चळवळीचा वसा भापकर गुरुजींनी घेतला असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सामाजिक प्रदुषण निवारण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी केले. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर (गुरूजी) यांनी जांबूळ वन उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमाला मोरे यांनी भेट देत वृक्षरोपण केले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी साकळाई कृती समितीचे अध्यक्ष रामदास झेंडे महाराज, संजय भापकर, भवानीप्रसाद चुंबळकर, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. याचबरोबर लिंब, कवठ, चिंच, कंरज यासारख्या बहुद्देशीय वृक्षाची लागवड करण्यात येत आहे. या उपक्रमाची दखल घेत अशा पर्यावरण संवर्धनासाठी मोठे कार्य करणाऱ्या भापकर गुरुजींना वनश्री पुरस्कार प्रदान करण्याची मागणी देखील मोरे यांनी केली आहे.