पुणे, दि. 15 – पुणे येथे बेंच आणि बारचे संबंध चांगले आहेत. आगामी काळातही ते असेच चांगले राहतील, असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश एस.सी.चांडक यांनी केले.
पुणे बार असोसिएशनतर्फे येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल निवड झाल्याबद्दल चांडक यांचा, तर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाल्याबद्दल पूर्वीचे प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्यायाधीश चांडक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, ऍड. लक्ष्मण येळे पाटील आदी उपस्थित होते.
वकील आणि न्यायाधीश एकमेकांना सहकार्य करतील. न्यायाधीश गुणवत्तेचा न्याय देतील, असेही चांडक यांनी म्हटले आहे. तर, “पुणे येथे काम करताना चांगला अनुभव आला. येथे मोठ-मोठ्या व्यक्तींच्या झालेल्या क्रांत्या समजून घेता आल्या,’ असे उच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी सांगितले.
ज्युनिअर वकिलांनाही मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “कायद्याचा अभ्यास एकट्याने नाही, तर एकत्रित करावा. अनेकांच्या लॉजिकने विविध कंसेट समजत असतात. अभ्यासासाठी चांगले मित्र असणे आवश्यक असणे मोलाचे आहे.’ तसेच, महालोकअदालतमध्ये वकिलांनी केलेल्या सहकार्यामुळे सहा वेळा राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला. अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांनी न्यायाधीश देशमुख यांचे कौतुक केले. त्यांनी वकिलांना घेऊन चांगले काम केले. येथे बार आणि बेंचचे संबंध चांगले राहिले आहेत. तर चांडक यांचे स्वागत केले. पुणे येथून उच्च न्यायालयाचे अंतर कमी आहे. येथील अनेक न्यायधीशांची उच्च न्यायालय येथे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याचे सांगितले. पुणे बार असोसिएशनचे सचिव ऍड. अमोल शितोळे यांनी केले. कार्यकारिणी सदस्य ऍड. काजल कवडे यांनी आभार मानले.