बीसीसीआयचा पश्चिम बंगाल सरकारला प्रस्ताव
कोलकाता – करोनाचा प्रभाव एकीकडे वाढत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलदेखील कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत ईडन गार्डन मैदानही विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी उपलब्ध करून देऊ, असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याने पश्चिम बंगाल सरकारला दिला आहे.
चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोनाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आता निर्णायक लढा देण्यासाठी संपूर्ण जग एकवटले आहे. जगभरातून केवळ विविध देशांतील सरकारच नव्हे तर जागतिक क्रीडापटू देखील पुढे येत मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यातच आता गांगुलीनेही पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयने पश्चिम बंगाल सरकारला हा प्रस्ताव दिला आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठे मैदान म्हणून नावाजले जात असलेले ईडन गार्डन मैदान विलगीकरण कक्ष बनविण्यासाठी खुले करून देण्याची आमची तयारी आहे. या मैदानाचा उपयोग रुग्णांवर उपचार तसेच त्यांचे विलगीकरण करण्यासाठी होऊ शकतो.