तीस वयोगटातील युवकांना संधी : जागतिक परिषदेत “ग्रामीण’ विचार मांडणार
बारामती- येथील युवा पिढीच्या प्रतिनिधी देवयानी रणजित पवार या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूईएफ) ने जिनिव्हा येथील मुख्यालयात आयोजित केलेल्या प्रतिष्ठित “ग्लोबल शेपर्स ऍन्युअल परिषदेत ग्रामीण भागाचे नेतृत्व करणार आहे. स्वित्झर्लॅंडमधील जिनिव्हा येथे होणाऱ्या तीस वर्षांहून कमी वयाच्या युवा वर्गाच्या विभागात सहभागी होण्यासाठी देवयानी यांना आमंत्रित केले आहे.
ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती विभागामध्ये निवडून आलेली व क्युरेटर असलेल्या देवयानी युवा नेत्यांच्या परिषदेत जागतिक व्यासपीठावर विचार मांडणार आहे. बारामती हबच्या माध्यमातून युवा एकत्र येत शाश्वत विकासासाठी कार्यरत राहतील. जगातील सहाशेहून अधिक ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना भेटण्याची संधी देवयानी यांना मिळणार आहे.
देवयानी यांनी कार्पोरेट कायद्याची पदवी संपादन केली असून त्यांनी बीबीएचीही पदवी प्राप्त केली आहे. जगप्रसिध्द लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी एमबीएची पदवी संपादन केली आहे.
जागतिक व्यासपीठावर तीस वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवा वर्गाचे प्रतिनिधीत्व करण्याची मला संधी मिळते आहे. ग्रामीण भागातील लोकांसोबत काम करताना मला जे अनुभव आले. ते मी व्यक्त करणार आहे. परिषदेच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. परिषदेत “डब्लूईएफ’चे संस्थापक क्लॉस श्वाब आणि ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या प्रमुख नताली पियर्स यांनी मांडलेले विचार माझ्या भविष्यातील प्रवासात महत्त्वपूर्ण ठरतील. असे यांनी नमूद केले.
– देवयानी पवार, क्युरेटर, बारामती.