प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -शालेय वयातील मुले शाळेत जाण्याऐवजी सिग्नलला उभे राहून भीक मागतात, किरकोळ वस्तू विकतात, अशी भिक्षेकरी मुले मोठ्या प्रमाणात असून, मर्यादित सर्वेक्षणातून शेकड्याचा आकडा पुढे आला आहे; तर संपूर्ण शहरातील आकडेवारी काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा!
शाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी ही मुले शाळेत न जाता सिग्नलवरच पैसे मागताना दिसतात. “सर्व सेवा संघ’ या संस्थेने यासंदर्भात 1 ते 13 ऑगस्ट दरम्यान 45 सिग्नलवर सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांना 193 मुले आढळली. हे मर्यादित सर्वेक्षण असले तरी संपूर्ण शहराचे सर्वेक्षण केल्यास ही संख्या हजारांवर जाईल हे निश्चित! शहरातील मंदिरे, मशीद, बसथांबे, रेल्वे स्थानक या भागात सर्वेक्षण केल्यास या मुलांची संख्या कैक पटीने वाढेल, असे संस्थेचे म्हणणे आहे.
संस्थेने केलेले सर्वेक्षण हे सहा वर्षांपुढील मुलांचे आहे. याशिवाय त्यापेक्षा कमी वयाची मुले कडेवर घेऊन मोठी मुले भिक्षा मागताना दिसतात. त्यांच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निष्कर्ष संस्थेने सर्वेक्षणातून काढले आहे. या आधीही 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत संस्थेने सर्व्हे केला होता. त्यामध्ये 35 सिग्नल्सवर 90 भिक्षेकरी मुले असल्याचे दिसून आले होते.