पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय काल जाहीर केला. यानंतर राज्याचे राजकीय वर्तुळासह देशातील राजकारणात देखील हा विषय चर्चेचा झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करायला सुरुवात केली. पुण्यात लागलेल्या अशाच काही बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.
शरद पवारांनी आपला निर्णय जाहीर करताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेतेही भावूक झाले. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्यांना यावेळी कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवसात विचार करुन निर्णय कळवतो असा निरोप शरद पवारांनी अजित पवारांकरवी दिला. अशात आता पुण्यात लागलेल्या बॅनर्सची जोरदार चर्चा आहे.
“साहेब, निवृत्त पदाधिकारी होत असतात. जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. आज महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार” अशा आशयाचे बॅनर्स पुण्यात लागले आहेत.
काय म्हणाले होते शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार आहे.” तसेच संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले.