मुंबई : राज्यसभा निवडणूक निकालात राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून ३ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले असून महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, आता या निकालानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसून येत आहेत. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून चक्क शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी शनिवारी शिवसेनेवर निशाणा साधणारे ट्वीट केले होते. त्यानंतर आता थेट शिवसेना भवनसमोरच संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. छत्रपतींच्या अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेश करावा अशी अट घातली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या छत्रपती संभाजी यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेनेविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. त्याशिवाय, ‘राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य में 2024 अभी बाकी है’ असा मजकूर ही या बॅनरवर आहे.