मुंबई : बोललीवूडच्या अनेक सिनेतारकांचे ड्रेस डिझाईन करणारी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचे निधन झाले आहे हैद्राबादमधील बंजारा हिल्स परिसरात असणाऱ्या तिच्या राहत्या घरी प्रत्युषाचा मृतदेह आढळला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फॅशन डिझायनर प्रत्युषाच्या निधनानंतर अनेक सेलेब्सकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
बंजारा हिल्स परिसरातील फिल्म नगर या भागामध्ये प्रत्युषा राहत होती. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या बेडरुममध्ये कार्बन मोनोऑक्साइड मिळालं आहे. तपास सुरु असताना हा संशयास्पद मृत्य असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास करण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्युषाच्या निधनाची बातमी सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली. सुरक्षा रक्षकाला काहीतरी विचित्र प्रकार घडत आहे याची जाणीव झाली. त्याने प्रत्युषाला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना बाथरुममध्ये प्रत्युषा मृतावस्थेत आढळली.
देशामधील सगळ्यात सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या यादीमध्ये प्रत्युषाचा देखील समावेश होता. तिचा स्वतःचा देखील एक फॅशन ब्रँड होता. प्रत्युषा गरिमेला असे तिच्या या फॅशन ब्रँडचे नाव होते. हैद्राबादसह मुंबईमध्ये तिच्या फॅशन ब्रँडच्या शाखा होत्या. प्रत्युषाने डिझाइन केलेल्या पारंपरिक ड्रेसला लोकांनी अधिक पसंती दिली.