मुंबई: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. थोरातांच्या शासकीय बंगल्यात करोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला करोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते.
थोरात यांनी आपली करोना टेस्ट केली होती. या टेस्टचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. करोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची करोना चाचणी करुन घेतली. ती निगेटिव्ह आली. मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन दिली.