पुणे(प्रतिनिधी) – गुटखा आणि तंबाखूची वाहतुक केल्याप्रकरणात चालकाला सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. करीम युनुस तांबोळी (वय 46, रा. थेरगाव) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. श्रीकृष्ण घुगे, अॅड. सचिन जगताप आणि अॅड. दयानंद लोंढे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 15 मे रोजी डांगे चौक रस्त्यावर थेरगाव फाटा येथे ही कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईत 99 हजार 600 रुपयांचा हिरा पान मसाला, 15 हजार 540 रुपायांची महा रोयॉल तंबाखू, 1 लाख 67 हजार 200 रुपयांचे गोवा 1000 गुटख्याचे पॅकेट आणि महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली होती. पोलिसांना थेरगाव परिसरात गस्त घालत असताना गाडीतून गुटखा सदृश वस्तुंची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसर कारवाई करून गाडीच्या चालकास अटक केली. वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना करीम याने जामिनासाठी अॅड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत अर्ज केला. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, तपास अधिकारी बोलावतील, त्यावेळी पोलीस स्टेशनला हजर राहणे, करोना संदर्भात खबरदारीचे प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.