व्हॅटिकन सिटी – जॆन्निक सिन्नर हा जवळपास अर्धशतकानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावणारा इटलीचा पहिला पुरुष खेळाडू ठरल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी समाधान व्यक्त केले आहे. रियल क्लब डी टेनिस बार्सिलोनाला भेट दिल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी ही पावती दिली. आज आम्हाला इटालियन लोकांचे अभिनंदन करायचे आहे कारण काल ते ऑस्ट्रेलियात जिंकले, म्हणून आम्ही त्यांचे देखील अभिनंदन करतो.
टेनिस हा एक वैयक्तिक खेळ आहे. पण या खेळात प्रखर राष्ट्रभावनाही आहे. त्यामुळे खेळाचे उद्दिष्ट चांगले असणे आवश्यक आहे, अशा शब्दांत पोप फ्रान्सिस यांनी सिन्नरच्या निमित्ताने समस्त इटलीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जॆन्निक सिनरने पहिल्या दोन सेटमधील पिछाडीवरुन पुढील तीनही सेट सहज जिंकत विजेतेपदाकडे वाटचाल केली. रविवारी झालेल्या या विलक्षण सामन्यात सिन्नरने डॅनिल मेदवेदेवचा ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव करत आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.
Australian Open 2024 : जॆन्निक सिन्नरची पिछाडीवरुन जेतेपदाकडे झेप…
ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणारा २२ वर्षीय सिन्नर हा पहिला इटालियन टेनिसपटू ठरला आहे. उपांत्य फेरीत त्याने जगज्जेता खेळाडू नोव्हाक जोकोविचचे स्पर्धेतील प्रदीर्घ वर्चस्व संपवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या विजेतपदावर त्याने सार्थ आपला हक्क प्रस्थापित केला.