Australian Open 2024 Men’s Doubles Final (India’s Rohan Bopanna and Australian Matthew Ebden) : भारताच्या रोहन बोपण्णाने शनिवारी त्याचा साथीदार मॅथ्यू एबडेनसह ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. तसेच तो पुरुष दुहेरीच्या इतिहासातील सर्वात वयस्कर नंबर वन खेळाडू ठरला आहे. द्वितीय मानांकित जोडीने रॉड लेव्हर एरिना येथे बिगरमानांकित इटालियन जोडी सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावासोरी यांच्यावर ७-६ (७/०), ७-५ असा विजय नोंदवला.
सांघिक म्हणून हे त्यांचे पहिले विजेतेपद होते आणि शेवटच्या 60 ग्रँडस्लॅमनंतर बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील पहिले विजेतेपद आहे. बोपण्णा सर्वाधिक सामने खेळून चॅम्पियन बनणारा खेळाडू ठरला आहे. पुढील आठवड्यात नवीन क्रमवारी जाहीर होईल तेव्हा 43 वर्षीय बोपण्णा पुरुष दुहेरीच्या इतिहासातील सर्वात वयस्कर नंबर वन खेळाडू बनेल.
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरीचे अंतिम विजेते रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन यांना एकूण 7,30,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळाले, भारताच्या चलनानुसार म्हणजेच रूपयानुसार अंदाजे 3 कोटी 98 लाख,96 हजार,256 रुपये होय. ही रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल. म्हणजेच बोपण्णा याला 1,99,48,132 रूपये मिळतील. ऑस्ट्रेलियन नियमांप्रमाणे तुमची 1,80,000 डाॅलरपेक्षा जास्त रक्कम असेल तर 45 टक्के कर भरावा लागतो. कर भरल्यानंतर बोपण्णा याच्या हातात सुमारे 1 कोटी 9 लाख 71 हजार आणि 413 रूपये असतील. भारतात मात्र बोपन्नाला यावर कर द्यावा लागणार नाही.
दरम्यान, 43 वर्षीय रोहन बोपण्णा ग्रँड स्लॅम (ओपन एरा) जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रॉजरच्या नावावर होता. रॉजरने (वय 40 वर्षे आणि नऊ महिने) मार्सेलो अरेव्होलसह 2022 फ्रेंच ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.