करोनाग्रस्ताच्या अंत्यविधीस 150 जणांची उपस्थिती

दौंडमध्ये खळबळ : शहरातील चौथा बळी; नियमांची पायमल्ली

दौंड – शहरातील करोना संशयित 70 वर्षीय वृद्धाचा सोमवारी (दि. 1) मृत्यूनंतर त्यांचा चाचणी अहवाल मंगळवारी (दि. 2) पॉझिटिव्ह आला आहे; मात्र या वृद्धाच्या अंत्यविधीला सुमारे 150 जण उपस्थित असल्याने खळबळ उडाली आहे. या वृद्धाच्या मृत्यूमुळे दौंड तालुक्‍यात करोनाचा चौथा बळी ठरला आहे. दरम्यान, अंत्यविधीसाठी मोजकेच नागरिक लोक उपस्थित हवे, या शासनाच्या आदेशाची दौंडमध्ये पायामल्ली झाल्याने आता संबंधितांवर काय कारवाई करणार का? हे पाहावे लागणार आहे.

दौंड शहरातील दि. 26 मे रोजी गोवा गल्ली येथील 70 वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. दौंड शहरातील हा पहिला बळी गेला होता. याच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्‍तीची त्यावेळी करोना विषाणूची तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. त्यामुळे संबंधित व्यक्‍तीला 14 दिवस घरात विलगीकरण होण्याची सक्‍त ताकीद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती.

मात्र, त्याला खोकला, ताप याचा त्रास अधिक होऊ लागल्याने तो व्यक्‍ती दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. यावेळी त्यांची मान्यताप्राप्त लॅबमध्ये करोना विषाणूची तपासणी करण्यात आली. सोमवारी (दि. 1) त्या व्यक्‍तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्‍तीच्या अंत्यविधीसाठी परिसरातील सुमारे 150 नागरिक उपस्थित होते.

मंगळवारी (दि. 2) या व्यक्‍तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. त्यामुळे त्या व्यक्‍तीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सर्वांची करोना विषाणूची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.