सातारा -करोनामुळे देश व राज्यावर मोठी आपत्ती आली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे गुरुवारी (दि. 4) 347 वा शिवराज्याभिषेक दिन आहे. सातारा येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने हा उत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उद्या, दि. 3 रोजी सायंकाळी 6.30 वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नागपूर येथील डॉ. सुमंत टेकाडे हे “छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थान कौशल्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
सातारा येथील समिती गेली 13 वर्षे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करत आहे. यंदा कोरोनामुळे शासनाने जाहीर व्याख्याने, मिरवणुका, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. शासनाच्या या आदेशाचे पालन करत शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने गुरुवार, दि. 4 रोजी पोवई नाका येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला प्रातिनिधिक स्वरूपात अभिषेक करण्यात येईल, अशी माहिती समितीचे सचिव नंदकुमार सावंत यांनी दिली.
यानिमित्त समितीतर्फे पाच सॅनिटायझर स्टॅंड पोलीस दलास भेट देण्यात येणार आहेत. करोना आपत्तीमध्ये विशेष सेवाकार्य करणाऱ्या संस्थाना सन्मानपत्रे देण्यात येणार आहेत. फेसबुक लाइव्हवरील व्याख्यानाचा लाभ शिवप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजू गोरे, जयंत देशपांडे, सतीश ओतारी, अमर बेंद्रे, डॉ. रवींद्र भारती-झुटिंग, अभिजित बारटक्के व रविकुमार कोठावळे यांनी केले आहे.