मुंबई : पोलीस हवालदाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई मधील दादर येथील शिंदेवाडी भागात हा प्रकार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. तब्बल चार तास त्याची समजूत घातल्यानंतर आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यात यश मिळाले. परंतु असे करण्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील एका चार मजली इमारतीच्या कठड्यावर पोलीस हवालदार उभा होता. हि बाबा निदर्शनास येताच काही जणांनी मागे होण्यास सांगूनही तो मागे न हटल्याने शंका निर्माण झाली. दरम्यान तो कसल्यातरी मानसिक दबावाखाली असून त्यावेळी रडत असल्याचेही म्हटले जात आहे .
त्या पोलीस हवालदाराची तब्बल चार तास तेथील रहिवासी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी समजूत काढत होते. त्यानंतर त्यांनाअथक प्रयत्नांनंतर त्याची समजूत घालून इमारतीखाली आणण्यात यश आले.