आयपीएल स्पर्धेसाठी शाहरूखच्या अटी…

मुंबई – आयपीएल स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणार असे मत बीसीसीआयने व्यक्‍त केल्यानंतर संघमालकांनी आनंद व्यक्‍त केला असला तरीही कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक व प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याने ही स्पर्धा खेळविण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. आता यावर बीसीसीआय काय मत व्यक्‍त करेल याकडे लक्ष लागले आहे.

करोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. ही स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसार 29 मार्च ते 17 मे या कालावधीत होणार होती. आता करोनाचा धोका थोडा कमी झाल्यानंतर व ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली जाण्याचे संकेत आयसीसीच्या बैठकीत मिळाल्यामुळे आयपीएल खेळविण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे.

या परिस्थितीत संघमालकांना व खेळाडूंना दिलासा मिळाला असला तरीही शाहरूखच्या तीन अटींमूळे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत.

ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणेच आयोजित केली जावी. तसेच सामन्यांची संख्या व रचना नेहमीचीच असावी. देशातील क्रिकेटपटूंबरोबरच परदेशी खेळाडूंनाही स्पर्धेत खेळता यावे या तीन प्रमुख अटी शाहरूखने ठेवल्या आहेत. अर्थात, करोनाचा धोका असल्यामुळे त्यावेळी हवाई प्रवासावरही बंदी लावली गेली होती. आता त्यात काही सवलती दिल्या असल्या तरीही परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीला 14 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार असल्याने शाहरूखच्या तिसऱ्या अटीचे पालन कसे करायचे याचा विचार आयपीएल संयोजकांना करावा लागणार आहे.

यातील एकही अट पूर्ण झाली नाही तर स्पर्धेच्या आयोजनाला विरोध होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच शाहरुखच्या या मागणीला अन्य संघ मालकांनीही समर्थ दिले तर बीसीसीआयच्या चिंतेत वाढ होणार आहे.

गांगुलीला त्रास देण्याचा हेतू आहे का?

आयपीएल स्पर्धा सुरू झाली तेव्हा बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली शाहरूखच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे कर्णधार व आयकॉन खेळाडू होते. संघाला सातत्याने अपयश आल्याने या दोघांमध्ये वितुष्ट आल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. आता गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष असल्यानेच शाहरूख जुने खोदकाम तर करत नाही ना, अशी चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.