दि पुना मर्चंट्स चेंबरचे पणन संचालकांना निवेदन
पुणे(प्रतिनिधी) – बाजार समितीच्या आवारात खरेदीवर देखरेख खर्च न आकारण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करत देखरेख खर्च न आकारण्याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला सुचना कराव्यात, या मागणीचे निवेदन भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दि पुना मर्चंटस चेंबरने पणन संचालकांना दिले असल्याची माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.
मार्केट यार्डात नियमित शेती मालाच्या खरेदीवर प्रत्येक शंभर रुपयामागे 5 पैसे देखरेख खर्च आकारला जातो. खरेदीवर आकारला जात असल्याने वर्षभरात याची मोठी रक्कम होत असते. यावर शासनाने नियुक्त केलेला निरीक्षक (सुपवाईझर) नेमलेला नसेल, तर अशा ठिकाणी व्यापाऱ्यांनी देखरेख शुल्क भरण्याची गरज नाही, असा आदेश 5 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.
याविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश करत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर देखरेख खर्च न आकारण्याबाबत मागणी केल्याचे पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.