रेडा -ज्यांना करोना झाला आहे व यामध्ये ज्यांना टीबीचा आजार आहे, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने घातक असणारा टीबी जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर विश्रामगृह येथे तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम या सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक खासदार सुळे यांच्या अध्यक्षतेखाली, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 18) पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे व तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
इंदापूर शहरातील काही कुटुंबांचा संपर्क बाहेरच्या जिल्ह्याशी आल्यामुळे संसर्ग वाढला आहे असे असले तरीदेखील,कोणीही काळजी करण्याची गरज नाही मात्र स्वच्छता व आंतर सुरक्षितता या दोन गोष्टी चे तंतोतंत पालन केले तर इंदापूर तालुका करोनामुक्त होण्यासाठी मदत होईल.
– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री