क्विन्सलॅंड – ऑस्ट्रेलिया महिला संघा विरुद्ध सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारताने वर्चस्व राखले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर भारतीय संघाने 8 बाद 377 धावांवर पहिला डाव घोषित केला. यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 4 बाद 143 धावांवर रोखले. यजमान ऑस्ट्रेलियाला आणखी 234 धावांनी पिछाडीवर असून फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 85 धावांची गरज आहे.
भारतीय महिला संघाने तिसऱ्या दिवशी 276 धावांपासून खेळाला सुरुवात केली. दीप्ती शर्मा आणि तानिया भाटिया चांगल्या लयीत दिसत होत्या, पण कॅपबेलने तानियाला बाद करत ही भागिदारी तोडली. तानियाने 75 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली.
तानियानंतर पूजा वस्त्राकरने 48 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा करत माघारी परतली. दुसरीकडे दीप्ती शर्माने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तीही जास्त वेळ मैदानात टिकू शकली नाही. दीप्तीने 167 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 66 धावा रचत संघाला 300 धावांचा आकडा पार करून दिली.
दीप्ती बाद झाल्यानंतर काही वेळाने भारतीय संघाने पहिला डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी, स्टेला कॅपबेल आणि सोफी मॉलिनेक्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तसेच ऍश्ले गार्डनरने 1 विकेट घेतली.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीतही बॅकफूटवर पडला आहे. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेर 60 षटकांमध्ये 4 बाद 143 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी 4 धावांवर बाद झाली. तिच्या पाठोपाठ सलामीवीर ऍलिसा हेलीदेखील 29 धावा करून माघारी परतली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग हीसुद्धा 38 धावांवर पल्हेलियनला परतली.
तिसऱ्या दिवसाअंती भारतीय संघाला ताहलिया मॅकग्राथच्या (28 धावा) रूपात चौथी विकेट घेण्यात यश आहे. दिवसाखेर ऍलिसा पेरी 27, तर ऍश्लिग गार्डनर 13 धावांवर खेळत आहे. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकारने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
सविस्तर निकाल –
भारतीय महिला संघ पहिला डाव – 145 षटकांत 8 बाद 377 धावांवर घोषित. (स्मृती मानधना 127, पूनम राऊत 36, शेफाली वर्मा 31, मिताली राज 30, दीप्ती शर्मा 66, तानिया भाटिया 22, सोफी मॉलिनेक्स 2-45, ऍश्ले गार्डनर 1-52, एलिस पेरी 2-76).
ऑस्ट्रेलिया महिला संघ पहिला डाव – 60 षटकांत 4 बाद 143. (ऍलिसा हेली 29, ऍलिसा पेरी खेळत आहे 27, ऍश्लिग गार्डनर खेळत आहे 13. झुलन गोस्वामी 2-27, पूजा वस्त्राकार 2-31).