कोथरुडमध्ये आघाडी एकही उमेदवार देणार नाही
काँग्रेस, राष्ट्रवादीने मनसेच्या किशोर शिंदेंना दिला पाठिंबा
पुणे – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघातील वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बहुचर्चित कोथरूड मतदारसंघातून किशोर शिंदे यांना मैदानात उतरवून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. तसेच चंद्रकांत यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनेही मनसेच्या किशोर शिंदेंना पाठिंबा दिला आहे. यामुळे आघाडी कोथरुडमध्ये एकही उमेदवार देणार नाही. त्यामुळे कोथरूडमध्ये आता नवे समीकरणे पाहण्यास मिळणार आहेत.
कोथरुड हा युतीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होत असत. मात्र गेल्फ्या विधानसभेला भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रभाव केला. गिरीश बापट यांना विक्रमी मताधिक्य मिळाले होते. सतत भाजप-शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या दृष्टीने सुरक्षित मतदार संघ असल्याने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदार संघातील विरोधक मात्र एकत्र येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडल्याचे जाहीर केले होते. पण, आता चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत.