एचडीआयएलच्या दोन संचालकांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच
मुंबई : पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी आता हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही संचालकांची तब्बल 3500 कोटींची संपत्ती आणि दहा खाती गोठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. तब्बल 4,355 कोटी रुपयांना फसवल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर (एचडीआयएल) या आघाडीच्या बिल्डर कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग वाधवान या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या 3500 कोटींच्या मालमत्तेवरही टाच आणली आहे.
पीएमसी बॅंकेचे कर्ज बुडवणारे एडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अट केली आहे. पीएमसी बॅंकेचे कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पीएमसी बॅंकेच्या नियमित व्यवहारांवर र्निबध आणतानाच, रिझर्व्ह बॅंकेने 25 सप्टेंबर रोजी संचालक मंडळ बरखास्त केले आणि जे. बी. भोरिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर खोटा ताळेबंद तयार केल्याची कबुली देणारे बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनाही पदावरून निलंबित केले गेले. देशातील अव्वल पहिल्या 10 सहकारी बॅंकांमध्ये समावेश असलेल्या पीएमसी बॅंकेत मार्च 2019 अखेर 11,600 कोटी रुपयांच्या ठेवींची नोंद आहे. बॅंकेच्या एकूण किरकोळ स्वरूपाच्या ठेवींमधील रक्कम 915 कोटी रुपये आहे.