बाजरी पिकावर पावसाची टांगती तलवार

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लाखणगाव -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील देवगाव, काठापूर, लाखणगाव परिसरात बाजरीचे पीक तयार झाले असून, पावसाच्या शक्‍यतेमुळे बाजरी काढावी की नाही या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. पाऊस पडला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बाजरीचे पीक घेतले जाते. पावसाळी बाजरीचे उत्पादन कमी होत असले तरी खाण्यासाठी पावसाळी बाजरी चांगली असल्याने अनेक शेतकरी पावसाळी बाजरीचे पीक घेतात.

पीक तयार झाले असून, बाजरी काढणी योग्य झाली आहे. मागील पाच-सहा दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे बाजरी पिकाची काढणी लांबणीवर पडली होती. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी हस्त नक्षत्रात पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याने बाजरी काढावी की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

येत्या दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर बाजरीची काढणी सुरू होण्याची शक्‍यता आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने बाजरीचे पीक चांगले आले असून, उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.