पिंपरी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने व सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत यंदाचा ‘आशा भोसले पुरस्कार’ सुप्रसिध्द पार्श्वगायक, संगीतकार शांतनू मुखर्जी उर्फ यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मान चिन्ह, १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा २० वे वर्ष आहे. दरवर्षी देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारास हा पुरस्कार दिला जातो, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे प्रमुख कार्यवाह सुहास जोशी, उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोशाध्यक्ष राजेंद्र बंग, सदस्य नरेंद्र आणले उपस्थित होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, गेल्या २४ वर्षांपासून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावाने ‘आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. यंदाचा पुरस्कार सोहळा रविवारी (दि. ११) सायंकाळी ५.३० वाजता कामगार कल्याण मैदान, भोईर नगर,चिंचवड येथे होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांची या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत “रजनीगंधा” हा कार्यक्रम होणार आहे.