कोची : केरळमध्ये देशव्यापी बंदच्या काळात नोबेल पुरस्कार विजेते मायकेल लेविट यांना रोखल्याबद्दल पोलिसांनी चार जणांना अटक केली.
रसायनशास्त्रातील 2013चा नोबेल पुरस्कार मिळवणारे मायकेल लेविट पत्नीसह अलप्पूझा येथे आले होते. त्यावेळी त्यांना कैनाकेरीजवळ रोखण्यात आले. मात्र या विषयी आपली काहीच तक्रार नसल्याचे लेव्हीट यांनी कोट्टयम येथे पत्रकारांना सांगितले.
कोट्टयमचे जिल्हाधिकारी सुधीर बाबू यांनी मायकेल लेवीट यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यांनतर जिल्हाधिकारी म्हणाले, मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी आपली काही तक्रार नसल्याचे सांगितले तसेच ते केरळला परत भेट देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
देशव्यापी बंदच्या दरम्यान लेवीट यांना बुधवारी तासभर रोखण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या टूर ऑपरेटरला इ मेल पाठवला. त्यावेळी ते खूपच अस्वस्थ झाले होते. त्या ई मेलमध्ये त्यांनी म्हटले आहे, मला जणू बंदुक डोक्याला लावून थांबवले आहे. ताकदीचा वापर करण्याची धमकी देत तास भर अडवून ठेवले. मला अडवणरा जो कोणी आहे, त्याला पर्यटकांना बंदमधून वगळले आहे, असे सांगून त्याने ऐकले नाही. मी केरळ सरकारचा विशेष निमंत्रित आहे, या युक्तीवादाकडे त्याने दुर्लक्ष केले. जणू आपल्यावर खटला होणार नाही याची त्याला खात्री असावी. यातून भारत कायदाशुन्य अवस्थेत जात आहे का? अशी मला भिती वाटते, असे अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या लेविट यांनी म्हटले होते.