सैन्यदल भरतीचा पेपर फुटला

पुणे – सैन्य भरती परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली. गुप्तचर विभागाच्या माहिती आधारे शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पुणे मुख्यालयातील दक्षिणी कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स युनिट आणि पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. यामध्ये सैनिक (जनरल ड्युटी) भरतीसाठी कॉमन एन्ट्रन्स परीक्षेची (सीईई) प्रश्‍नपत्रिका मिळाली आहे. यामध्ये मिळालेली प्रश्‍नपत्रिका प्रत्यक्षात नियोजित परीक्षेची असल्याची खात्री झाल्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत लष्कराच्या माजी सैनिकाला आणि दोन नागरिकांना अटक केली आहे. पेपर कसे फुटले आणि संशयित ते कसे वितरित करीत होते, याचा शोध घेण्यात येत आहे. सध्या सेवेत असणाऱ्या जवानांच्या संभाव्य सहभागाचीही चौकशी केली जात आहे.

संशयितांनी प्रत्येक उमेदवाराकडून परीक्षेच्या पेपरसाठी 4 ते 5 लाख रुपये घेतले असल्याची माहिती चौकशीत उघडकीस आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यांतील तसेच इतर राज्यांतील इच्छुकांशी त्यांनी संपर्क साधला होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.