पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून वाहनांची मोडतोड; दोन तरुण गंभीर जखमी

येरवडा : येरवड्यातील फुलेनगर व जयजवाननगर परिसरात पूर्ववैमनस्यातून सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची मोडतोड करण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जयजवाननगर गुरुद्वाराजवळ अज्ञात इसमांनी येऊन घराच्या प्रवेशद्वारांवर लाथा मारून शिवीगाळ केल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर
फुलेनगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमी केले. या घटनेत 7 ते 8 वाहनांचे नुकसान झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या या हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व कोयते आणि दगडाच्या साह्याने वाहनांवर दगडफेक करीत परिसरात दहशत माजवली. दोन तरुण या घटनेत जखमी झाले. घटनास्थळी येरवडा पोलिसांनी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले. यातील जखमी तरुणांना उपचारासाठी येरवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फुलेनगर सोसायटी परिसरातील हनुमान मंदिर, महात्मा फुले उद्यान तसेच आळंदी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची टोळक्याने मोडतोड केली आहे. महात्मा उद्यानाजवळील परिसरात दारू गांजा पिण्यासाठी बाहेरची मुले नेहमी येत असल्याचे समजते. निर्मनुष्य ठिकाणी ही मुले दारू, गांजा पिऊन गोंधळ घालत असतात.

दोन दिवसांपूर्वी या परिसरात काही मुलांचा वाद झाला होता. त्यातूनच रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची मोडतोड करीत दोन तरुण गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे फुलेनगर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सशस्त्र टोळक्याने दोन ठिकाणी केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.