जळगाव – जळगावात भरदिवसा बॅंकेवर दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तीन दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटले. या दरोड्यानंतर चोरटे पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेत आहे. मात्र दिवसाढवळ्या पडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बॅंकेच्या शाखेवर हा दरोडा पडला. कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज (1 जून) सकाळी नऊ वाजता बॅंक उघडून नियमितपणे कारभार सुरु झाला होता. मात्र सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरुन बॅंकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच ते सहा कर्मचाऱ्यांना धमकावले. यावेळी दरोडेखोरांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी बॅंकेतील रोकड घेऊन तिथून पळ काढला.
हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बॅंकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतचा थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यांनी बॅंकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅंकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आढावा घेतला. याशिवाय श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.