पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिवरी गावात दरोडेखोरांनी मंगळवारी (दि.२) पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. यात एका कुटुंबाच्या सहा ते सात जणांच्या गळ्याला चाकू लावून रोकड, दागिने असा १६ लाखांचा मुद्देमाल लुटून पळ काढला. दरोडेखोरांनी महिलांना मारहाण दागिने अक्षरश: ओरबाडून घेतले. दरम्यान, वृद्धेच्या कानातून दागिने निघत नसल्याने दरोडेखोराने ते ओढले असता, महिलेचा कान तुटल्याची माहिती लोणीकंद पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याप्रकरणी, प्रशांत गोते (वय-४०,रा. बिवरी, नायगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोते हे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार विभागप्रमुख आहेत. बिवरी गावात ते कुटुंबीयांसह राहतात. गावची जत्रा असल्याने त्यांची बहीण आणि दाजी घरी आले होते. त्यांनी आरोग्य उपचारांसाठी तीन लाख रुपये आणले होते.
गोते यांना उसाच्या बिलाचे दोन लाख रुपये मिळाले होते. असे पाच लाख रुपये गोते यांच्या कपाटात होती. रम्यान, मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यावर आई आणि मुलांचा आवाज ऐकून कुटुंबिय जागे झाले. तेव्हा मास्क लावलेल्या सात जणांनी घरातील महिलांच्या गळ्याला चाकू लावून पाच लाख रुपये काढून घेतले.
त्यानंतर आरोपींनी गोते यांच्या आई आणि बहिणीला मारहाण करत दागिने हिसकावले. शिवाय, गोते यांच्या पत्नी आणि दाजींच्या अंगावरील दागिने काढून घेतले. गोते यांच्या आईच्या कानातील रिंग निघत नसल्याने आरोपींनी ती ओरबाडली. त्यात वृद्धेचा कान तुटला. यानंतर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत शेतातून पळून गेले. गोते यांनी पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली.
पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक कैलास करे, सीमा ढाकणे यांनी श्वान पथकासह गुन्हे शाखा आणि इतर पथकांनी दरोडेखोरांचा माग सुरू केला आहे.