मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे नेते चांगलेच संतापले असल्याचे दिसत आहे. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत, असा खोचक सवाल करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत:येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.
मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून मनसे नेत्यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तरीही मनसे कार्यक्रम घेण्यावर आग्रही आहे. आम्ही जबाबरीने योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारच्या कोरोनासंबधीच्या नियमांवर बोट ठेवले. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने मुंबईतील ओव्हल मैदान बंद ठेवले आहे. मात्र, मैदानावर बंदी घातल्याने कोरोना कमी होत नाही. राज्य सरकारने याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.