पुणे – मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने उच्च माध्यमिक अध्यापकांच्या संकल्पनेतून “साहित्यवेदी’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. गुरुवारी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण झाले.
मराठी भाषेचा प्रवास, कोशसंपदा, सुलेखनकला व्यवसाय, युवा साहित्यकार आढावा, सर्व वाङ्मयीन नियतकालिकांची ओळख आणि कार्य, महाराष्ट्र बोलींचे नमुने आणि परिचय, महाराष्ट्रातील शताब्दी ग्रंथालयांचे एकत्रित दालन, अनेक साहित्यकारांच्या निवासभेटीची परिक्रमा आदी विषयांचा समावेश असणारे “साहित्यवेदी’ (www.sahityavedi.com) हे संकेतस्थळ आहे.
डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद आणि नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. शालेयस्तरापासून ते संशोधक-अभ्यासकांसाठी याचा उपयोग होणार आहे. “साहित्यवेदी’ या संकेतस्थळामुळे मराठी भाषा आणि साहित्य यांची सर्व अंगे एकत्रित मिळतील. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठीतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि जगातील सर्व मराठी भाषकांना जोडणे यामुळे शक्य होणार आहे. मंत्रालयातर्फे जागतिक मंच तयार केला जात आहे. त्याच्याशी हे संकेतस्थळ जोडून घेता येणार असल्याचे देसाई म्हणाले.
शाळांतील कार्यक्रम ऑनलाइनच
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी शाळांमध्ये या दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यंदा करोनामुळे शाळांमार्फत ऑनलाइन उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.