लंडन: इंग्लंडमधील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात मैदानावरील पंचाने अत्यंत गमतीदार पण तितकाच अनाकलनिय निर्णय दिला. खेळाडूंनी फलंदाजाविरुद्ध पायचितचे अपिल केले होते, मात्र पंचांनी चक्क हा चेंडू वाईडबॉल ठरवला.
मैदानावरील पंचांकडून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवे तंत्रज्ञान देखील आणले. मात्र अजुनही स्थानिक पातळीवरील पंच चुका करतात हे देखील अनेकदा सिद्ध झाले आहे.
अशीच एक घटना इंग्लंडमधील स्थानिक सामन्यात घडली व त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहे. इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट सामन्यात फलंदाजाने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या पॅडवर लागल्याने गोलंदाजासह सगळ्या खेळाडूंनी पंचांकडे पायचितचे अपिल केले. पण पंचांनी हा चेंडू चक्क वाईड बॉल घोषित केला.
पंचांनी दिलेल्या निर्णयावर चिडण्याएवजी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंना हसु आवरले नाही. आता अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत, म्हणूनच ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीतील पंचांच्या कामगिरीची दखल घेत आयसीसीने आता चेंडू नोबॉल आहे का ते पाहण्यासाठी अतिरिक्त पंच नेमण्याचे निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीत तब्बल 21 चेंडू नो बॉल होते, मात्र पंचांना ते दिसलेच नाहीत.